नफेखोरीमुळे शेअर निर्देशांकांत घट

क्रूड वधारल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर झाला परिणाम

मुंबई – देशातील आणि परदेशातील भांडवल सुलभतेमुळे सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बऱ्याच उच्च पातळीवर आहेत. आता निवडणुका सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर पुढील आठवड्यापासून भारतातील कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. या कारणामुळे सावध गुंतवणूदारांनी सोमवारी बरीच विक्री केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात घट झाली.
सोमवारी वित्त, धातू आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली. त्यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 161 अंकांनी कमी होऊन 38,700 अंकांवर बंद झाला.

तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 61 अंकांनी कमी होऊन 11,604 अंकांवर बंद झाला. आज जागतिक बाजारात क्रूडचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले नाहीत. सेन्सेक्‍स संबंधातील 30 कंपन्यांपैकी वीस कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले. तर दहा कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले.

मुख्य निर्देशांकाबरोबरच छोट्या कंपन्याचे मिडकॅप 0.87 टक्‍क्‍यांनी तर स्मॉलकॅप 0.57 टक्‍क्‍यांनी कमी झाले. सोमवारी रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक 2.67 टक्‍क्‍यांनी, ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 1.27 टक्‍क्‍यानी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 1.47 टक्‍क्‍यांनी तर वित्त क्षेत्राचा निर्देशांक 0.8 टक्‍क्‍यांनी कमी झाला. क्रूडच्या किमती वाढत असल्यामुळे त्याचा रुपयाच्या मूल्यावर आता दबाव येऊ लागला आहे. दुपारी रुपयाचे मूल्य 38 पैशांनी कमी झाले होते.

रेंगाळलेला ब्रेक्‍झिट करार, त्याचबरोबर क्रूड वधारल्याने घसरलेला रुपया या कारणामुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचे वातावरण होते. निवडणुकांचे निकाल आणि कंपन्यांचे चौथ्या तिमाहीचे ताळेबंदी याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असल्यामुळे काही दिवस गुंतवणूकदार नफा काढून घेण्याची शक्‍यता आहे.
-विनोद नायर, संशोधन प्रमुख, जीओजी वित्तीय सेवा

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.