हैदराबाद – भारतात लॉकडाऊन असल्याने स्पर्धाच काय पण सरावही करता येत नसल्याने भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने आपण आता रिकाम्या टेनिस कोर्टवर देखील स्पर्धा खेळण्यास तयार असल्याचे मत व्यक्त केले आहे.
करोनाचा धोका संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. तसेच त्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत. तसेच काही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत कित्येक दिवस घरात बसून मानसिकतेवर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे एकवेळ टेनिस कोर्टवर एकाही प्रेक्षकाला प्रवेश देऊ नका पण स्पर्धा खेळवा, असे हताश मत सानियाने व्यक्त केले आहे.
एक खेळाडू म्हणून आम्ही सामना खेळण्यासाठी मैदानावर येतो त्यावेळी टेनिस शौकिन पाठिंबा देतात तेव्हा विजयासाठी प्रेरणा मिळते. करोनाचा धोका पाहता आता प्रेक्षक नसतील तर खेळणारच नाही असे सांगणे चूक ठरेल. हा धोका कधी संपणार व खेळ कधी सुरु होणार याकडे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे एकवेळ रिकामे टेनिस कोर्ट ठेवा पण स्पर्धा खेळवा असेच म्हणावेसे वाटते, असेही सानियाने स्पष्ट केले.
टेनिस विश्वात सर्वात मानाची समजली जाणारी विम्बल्डन स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. तसेच फ्रेंच ओपन स्पर्धादेखील लांबणीवर पडली आहे. हे सर्व पाहता अत्यंत निराशा येते. करोनापासून कधी सुटका होणार हाच विचार सातत्याने मनात येतो. आता मात्र लवकरात लवकर टेनिस कोर्टवर परतावेसे वाटते, असेही सानिया म्हणाली.