कोपनहेगन (अमेरिका) – करोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी ठिकठिकाणी लागू असलेले निर्बंध आता हळूहळू शिथिल केले जायला सुरुवात झाली आहे. डेन्मार्कमधील सलून आणि टॅटू पार्लर, ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारे, जर्मनीतील पुस्तकांची दुकाने नियंत्रित प्रमाणात उघडली जायला सुरुवात झाली आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेत मात्र अधिक सावध भूमिका घेतली जाते आहे. निर्बंध हटवण्याबाबत राजकीय मतभेद वाढायला लागले आहे. अमेरिकेतील राज्यांमध्ये लादलेल्या “स्टे-ऍट-होम’ ऑर्डर उठविण्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून उघडपणे प्रोत्साहन दिले होते. रिपब्लिकन पक्षाचे गव्हर्नर असलेल्या काही राज्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यास सुरुवातही झाली आहे.
मात्र अन्य राज्यांनी व्यापक चाचण्या झाल्याशिवाय इतक्यात निर्बंध न उठवण्याची भूमिका घेतली आहे. “कोणत्याही देशात लॉकडाउन उठवण्याइतकी साथ अद्याप आटोक्यात आलेली नाही. साथीच्या पुढच्या टप्प्याची ही नुसती सुरुवात आहे.’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍडनॉम घेब्रेयसियस यांनी जी -20 आरोग्य मंत्र्यांच्या ऑनलाईन बैठकीत सांगितले. इतक्यात निर्बंध उठवण्याची घाई करू नका, असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
मात्र देशातील काही भागावरील निर्बंध हळूहळू उठवायला तयार असल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील सदस्यांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम म्हणून सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर बसवून शेकडो निदर्शकांनी शटडाऊन उठवण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली होती. मात्र सोमवारी सरकारचे संसर्गजन्य-रोगविभागाचे वरिष्ठ तज्ज्ञ अँथनी फौकी यांनी जोपर्यंत विषाणूची साथ आटोक्यात येत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेला सामान्य केले जाऊच शकणार नाही. ही घाई आतताईपणाची ठरेल. टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणेही धोकादायक आहे. त्याचे उलट परिणाम होऊ शकतील, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आणि अध्यक्ष्यांच्या भूमिका विरोध केला.