मुंबई – सचिन वाझे प्रकरणात एनआयएकडून तपास मोहीम वेगाने सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकरणात एनआयएने आणखी एक मर्सिडीज जप्त केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 वाहने जप्त करण्यात आली आहेत. आता एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून या वाहनाची तपासणी सुरु आहे. त्यामुळे यातून आता नेमक कोणते गूढ उकलते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यापूर्वी एक स्पॉर्पिओ, इनोव्हा, प्रॅडो आणि एक मर्सिडीज गाडी जप्त केली आहे.
एनआयएने गुरुवारी दुपारी दुसरी मर्सिडीज जप्त करुन ती कार्यालयात आणली. त्यानंतर या गाडीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. एनआयएने पहिल्यांदा स्कॉर्पिओ ताब्यात घेतली. त्यानंतर इनोव्हा गाडी ताब्यात घेतली. त्यानंतर सचिन वाझेंना अटक करण्यात आली.
पुढे सचिन वाझेंच्या चौकशीनंतर एक मर्सिडीज ताब्यात घेण्यात आली. ती गाडी सीएसएमटी जवळच्या एका पार्किंगमधून ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एक मर्सिडीज ताब्यात घेतली आहे. यातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
संशयास्पद इनोव्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद आढळलेली इनोव्हा मुलुंड टोलनाक्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही गाडी स्वतः सचिन वाझे चालवत असल्याचा संशय एनआयएला आहे. तसेच 25 फेब्रुवारी रोजीचे रात्री एक वाजून 20 मिनिटांचे मुलुंड टोलनाक्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये आरोपींनी पळ काढलेली संशयास्पद इनोव्हा गाडी दिसत आहे.
दरम्यान, मुलुंड टोलनाक्यापुढे पडघा टोल नाका येतो आणि इनोव्हा गाडी हाच टोलनाका पार करताना दिसत नाही. तपास यंत्रणांनी पडघा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज पुन्हा पुन्हा तपासले. परंतु, ती गाडी सीसीटीव्हीमध्ये दिसली नव्हती.