नवी दिल्ली – करोनाचा प्रसाराचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्यांनी निर्बंधांच्या दृष्टीने काही पाउले उचलण्यास सुरूवात केली असली तरी रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येते आहे.
गेल्या 24 तासांत 35 हजार 886 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात सगळ्यांत जास्त असून देशभरातील एकूण रूग्णांमध्ये राज्यातील रूग्णांची संख्या 64 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत 3.64 कोटी लोकांना लस
देशभरात 16 जानेवारीपासून करोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून त्या अंतर्गत आतापर्यंत 3.64 कोटी नागरिकांना लस देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार लसीचे बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 3 कोटी 64 लाख 67 हजार 744 डोस देण्यात आले आहेत. आरोग्य सेवेतील 75 लाख 47 हजार 958 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 46 लाख 83 हजार 97 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
फ्रंटलाइन वर्कर्सनाही लस प्राधान्याने दिली जात असून आतापर्यंत 76 लाख 60 हजार जणांना पहिला तर 17 लाख 86 हजार फ्रंटलाइन वर्कर्सना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.