अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ?; स्वीय सहाय्यकांना सीबीआयचे समन्स

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे. कारण सीबीआयने अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एवढंच नाहीतर अनिल देशमुख यांचीही सीबीआयकडून चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सीबीआयकडून यापूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे यांचीही चौकशी करण्यात आली होती. या दोघांच्याही चौकशीत अनिल देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकांची नाव समोर आली होती. काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयनं याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबानं केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. आता अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांचीही याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नोकरीत पुन्हा घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. जून, ऑगस्ट 2020 मध्ये SBUT ट्रस्टीकडून 50 कोटी गोळा करण्याचाआरोप अनिल परबांवर करण्यात आला आहे. जानेवारी 2021 मध्ये मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचाही आरोप आहे.

सचिन वाझे प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काही दिवसांपूर्वीच गृह विभागाला अहवाल सादर केला आहे. पोलीस आयुक्तांच्या अहवालानंतर परमबीर सिंह यांच्या‌ चौकशीचे आदेश सरकारचे‌ आदेश दिले आहेत. पोलीस महासंचालक संजय‌ पांडे यांना प्राथमिक‌‌ चौकशीचे‌ आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशीत परमबीर सिंह दोषी आढळल्यास‌ राज्य‌ सरकारकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी 30 मार्चला अहवाल दिल्यानंतर 1 एप्रिलला चौकशीबाबत‌ आदेश निघाले होते. मुंबई पोलीस आयुक्तांच्या‌ अहवालात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.