मॉस्को – ज्या दोन प्रदेशांना रशियाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे, तेथे रशियासमर्थक बंडखोर आणि युक्रेनच्या फौजा यांच्यात गेली आठ वर्ष लहान सहान चकमकी उडत आहेत. त्यात 14 हजारहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादमिर पुतीन यांनी तेथे फौजा घुसवल्याने तेथे युक्रेनबरोबर सीमेवर युध्द होण्याचा धोका आहे.
बंडखोर आणि युक्रेनी फौजा यांच्यातील या युध्दाला 2014 मध्ये सुरवात झाली. सरकारी इमारती आणि काही शहरावर रशियन बंडखोरांनी कब्जा केल्याने या युध्दाची ठिणगी पडली. लुहान्सक आणि डोनेत्सक ओब्लास्ट या शहरांवर कब्जा मिळवला. त्यानंतर क्रिमीयाही युक्रेनपासून रशियाने 2014 मध्ये तोडला. त्यावेळी जगभरातून रशियाच्या निषेधाचे स्वर उमटले होते.
बंडखोरांच्या ताब्यात असणाऱ्या डोन्वास हा भाग लुहान्स्क आणि डोनेस्त्क या नावाने ओळखला जातो. हे दोन्ही प्रदेश रशियाच्याच ताब्यात असल्याचा युक्रेनचा दावा आहे. या स्वयंघोषित स्वतंत्र राष्ट्रांना रशियावगळता अन्य कोणत्याही राष्ट्राचा पाठिंबा नाही. त्यामुळे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास युक्रेन सरकारने ठाम नकार दिला आहे.
या प्रदेशात आणि युक्रेनमध्ये शांतता करार (मिन्स्क-2 )2015 मध्ये झाला. त्यानंतर युध्द थांबले. बंडखोरांच्या ताब्यातील प्रदेश आणि युक्रेन वेगळे झाले. त्या करारानुसार प्रत्यक्ष संपर्क रेषेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्जता ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
रशियाचा संबंध
डोन्बासमधील विलगतावाद्यांना रशियाचा पाठिंबा आहे. मात्र रशियाने ते वेळोवेळी नाकारले आहे. अमेरिका नाटो आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या मते बंडखोरांना रशियाकडून सल्ला आणि गुप्तचर मदत दिली जाते. येवढेच नव्हे तर त्यांच्या सैन्यात रशियाचे अधिकारीही नियुक्त असल्याचा दावा केला जात आहे. रशियाने अलीकडील काही वर्षात तेथील हजारो जणांना रीशयाचा पासपोर्ट वितरीत केला आहे.