वंदना बर्वे
नवी दिल्ली – यूपी विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात कॉग्रेसच्या उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. उद्या बुधवार दि. 23 रोजी चौथ्या टप्प्यासाठी मतदान केले जाणार असून एकूण 621 उमेदवार मैदानात आहेत. यातील कॉग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे प्रत्येकी 22, भाजपचे 17 आणि आम आदमी पक्षाचे नउ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीत 621 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यातील 167 उमेदवारांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. यातील 129 जणांवर बलात्कार, खंडणी आणि हत्या यासारखे गुन्हे दाखल आहेत.
उद्या दि. 23 फेब्रुवारी रोजी 59 मतदारसंघात चौथ्या टप्प्याची निवडणूक होत आहे. यातील 29 मतदारसंघ अतिशय संवेदनशील असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या भागातील दोन उमेदवारांवर बलात्कार, पाच जणांवर हत्या आणि 11 जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्यांना उमेदवारी दिली आहे.
कॉग्रेसच्या 58 पैकी 22 उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. समाजवादी पक्षाच्या 55 पैकी 22, बहुजन समाज पक्षाच्या 59 पैकी 22 आणि भाजपच्या 57 पैकी 17 उमेदवारांवर गंभीर गुन्हे आहेत. आम आदमी पक्षाचे 45 पैकी नउ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.