पुणे – पुण्यातील वाहनचालक आणी वाहतूक पोलीस यांच्यातील संबंध सर्वश्रृतच आहे. राज्यात हेल्मेट सक्तीचे पालन होत असताना फक्त पुण्यातूनच हेल्मेट सक्ती विरोधात रान पेटले होते. यात पोलिसांना एक पाऊल माघार घ्यावी लागली.
अद्यापही पोलीस हेल्मेट सक्ती बद्दल ब्र देखील काढत नाहीत. तर असे पुण्यातील काही वाहनचालक वाहतूकीचा नियम मोडल्यावर दंड चुकविण्यासाठीही वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात तर काही चलाख वाहतूकीचा दंड बसूच नये म्हणूनही काही क्लुप्त्या वापरत असतात.मात्र अशीच एक क्लुप्ती वाहनचालकाच्या भलतीच अंगलट आली आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद कटारिया ( रा.भापकर पेट्रोलपंपासमोर) असे गुन्हा दाखल झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याव्दारे वाहतूकीचा दंड बसू नये म्हणून चक्का गाडीच्या नंबरमधील एक क्रमांकच काढून टाकला होता. ही बाब खडक वाहतूक विभागातील पोलीस शिपाई धीरज शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने यासंदर्भात फिर्याद दाखल केली.
कटारीयाने 2019 पासून आजपर्यंत त्याच्या ऍक्टीव्हा गाडीचा क्रमांक एमएच 12 जेडब्लु 8865 यातील 8 क्रमांक खोडून फक्त 865 हाच क्रमांक ठेवला. फिर्यादी धीरज शेलार यांनी वाहतूक नियमन करताना त्याला थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र तो निघुन जात असताना, त्याला पाठलाग करुन पकडण्यात आले. त्याला परवान्यासंदर्भात विचारणा केली असता, तो माहिती न देता तिथून निघुन गेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक घाडगे करत आहेत.