पुणे – रिक्षा संपात काही संघटना सहभागी नव्हत्या. तर, काही जण संपाचे कारण सांगून इतर रिक्षा चालकांना दमदाटी करत होते. दरम्यान, ज्य रिक्षा सुरू होत्या, त्यांच्याकडून नागरिकांची आर्थिक लूट करण्यत आल्याचे प्रकार घडले, तर काही रिक्षाचालक भाडे नाकारताना दिसले.
सोमवारी डेक्कन कॉर्नर येथे काही तरुणी सेनापती बापट रस्ता येथील एका सुपर मार्केटकडे जाण्यासाठी रिक्षा चालकांना विचारत होते. या अवघ्या दोन ते अडीच किलोमीटरसाठी रिक्षाचालक 250 रुपये मागणी करत होते. तसेच पुणे रेल्वे स्थानकावर देखील हाच प्रकार पहायला मिळाला. पुणे स्टेशन ते भवानी पेठेपर्यंत 300 रुपयांची मागणी केली जात होती. काही ठिकाणी चालकंना जबरदस्ती रिक्षा बाजूला लावायला सांगितले गेले. शहरात बऱ्याच ठिकाणी रिक्षा चालकांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.
“मला सेनापती बापट रस्त्यावरील सुपर मार्केटकडे जायचे होते. रिक्षा बंद असल्यामुळे मी ओला आणि उबेर ऍपद्वरे रिक्षा बुकिंग केले. पण, एकही रिक्षा येत नव्हती. मी डेक्कन येथील रिक्षा चालकांना विनंती केली, पण एकहीजण येत नव्हते. काही रिक्षाचालक 250 रुपये भाडे मागत होते.” – प्रतीक्षा काळे, प्रवासी
रेल्वेकडून प्रवाशांना अवाहन
शहरात सोमवारी झालेल्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या पूर्वी काही वेळ लवकर येण्याचे अवाहन केले आहे. रेल्वे सुटू नये, म्हणून प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर लवकर यावे असे प्रशासनाने म्हटले आहे.
घटनाक्रम
सकाळी 10 – रिक्षा चालक आरटीओसमोर जमा होण्यास सुरुवात
12.00 – रिक्षा संघटनांनी आरटीओ प्रमुख अजित शिंदे यांना दिले निवेदन
12.30 – रिक्षा संघटनांच्या प्रमुखांनी सहपोलीस आयुक्तांची घेतली भेट
दुपारी 1.00 – रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींचे भाषण
3.30 – संगम पुलावर दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर रिक्षा आडव्या लावल्या
4 – रिक्षा संघटनांचे जुना बाजार चौकात आंदोलन
5.30 – संचेती हॉस्पिटल येथील पुलावर आंदोलन
6.30 – रिक्षा चालक संगम पुलावर रिक्षा सोडून घरी गेले