पुणे – घरजावयाला घर सोडून जाण्यास सांगितल्याने जावयाने सासूला मारहाण करत तिचे दोन दात पाडले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सासूला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सुजाता कैलास शिंदे (50) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे.
याप्रकरणी, खडकी पोलिसांनी महेंद्र सिद्धनाथ तोरणे (25,आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार कॉलनी मुळा रोड) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याबाबत सुजाता शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 22 मे रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजाता शिंदे या खडकी येथील ऍम्युनेशन फॅक्टरीत नोकरीस आहेत. आरोपी महेंद्र हा त्यांचा जावई असून, त्यांची मुलगी आणि त्या असे तिघे आर्मी क्वार्टर सर्वत्र विहार कॉलनीत राहतात. सोमवारी सकाळी जावई आणि सासू यांच्यात वाद झाला.
त्यावेळी त्यांनी जावयाला घरातून दुसरीकडे राहण्यास जाण्यास सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने गरम पाणी सासूच्या तोंडावर टाकले. त्यानंतर केसाला धरून डोके खाली फरशीवर आपटून त्यांच्या तोंडातील दोन दात पाडले. पाणी तोंडावर टाकल्याने सासूच्या चेहऱ्याला भाजले आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बेंदगुडे करीत आहेत.