मुंबई – भाजपच्या राजकारणात काहीशा मागे पडलेल्या पंकजा मुंडे यांनी आपण सध्या गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रीय पातळीवर खूप काही करत आहे असे नाही. मी पक्षाची राष्ट्रीय सचिव आहे. मध्य प्रदेशाची सहप्रभारी आहे. मी वरिष्ठांच्या सूचनांनुसार कार्य करते. पण राजकीयदृष्ट्या समाधानी म्हणाल, तर मी स्वतः प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे यांनी मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, भाजपतील माझी भूमिका राज्यात नव्हे तर राज्याबाहेर आहे. पण बाहेर काम करत असले तरी आमची मुळे राज्यातच आहेत. उदाहरणार्थ प्रमोद महाजन पूर्णवेळ राष्ट्रीय राजकारणात शिफ्ट झाले. ते गोपीनाथ मुंडे यांना जमले नाही. कारण त्यांचा मतदार संघ व ग्राउंड पातळीवरील समर्थक होते. त्यामुळे येथे आमची मुळे आहेत. या मुळांना मी काय देऊ शकते, हेच माझे राजकारणातील ध्येय असणार आहे.
भविष्यात माझे राजकारण काय असेल? असा माझ्यासह अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण आता नवीन मित्र आमच्याशी जोडला गेला आहे. तिकीट वाटप कसे असेल? तेव्हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. या स्थितीतून मी कशी बाहेर पडेल, हे ही मी सांगू शकत नाही. पण मी निश्चितच बाहेर पडेन, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
तसेच, सद्यस्थितीत माझ्यासारखीच अनेकांची स्थिती आहे. पण कुणी समोर येऊन बोलण्याचे धाडस करत नाही. मला अभूतपूर्व व अद्वितीय असा अनुभव आला आहे. जनतेचा मिळणारा प्रतिसाद आत्मविश्वास वाढवणारा व सकारात्मक बळ देणारा आहे. मी वाट पाहत आहे. आज राजकीय पटलावर माझ्याकडे असणारी ताकद ही लोकांचीच आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
लोकसभा लढवणार नाही –
पंकजा मुंडे यांनी यावेळी आपला डोळा प्रीतम मुंडे यांच्या लोकसभा मतदार संघावर नसल्याचेही स्पष्ट केले. मागील 10 वर्षांपासून खासदार असणाऱ्या दररोज झटणाऱ्या प्रीतम मुंडे यांना विस्थापित करून मी स्वतःचे प्रस्थ स्थापन करणार नाही. प्रीतम जे करू शकतात, ते त्याच करू शकतात. खासदार म्हणून त्यांनी आपल्या पदाला न्याय दिला आहे. त्या मतदार संघातील जनतेच्या संपर्कात आहेत. त्यांचा संपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांचे काम पुसावे त्याला अहंकार म्हणतात, तो माझ्यात नाही, असे त्या म्हणाल्या.