भुवनेश्वर – तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी ओडिशा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजेरी लावली. अधिवेशनाला उपस्थित राहण्यापूर्वी पटनायक यांनी विधानसभेच्या आवारात झालेल्या सत्ताधारी बीजेडी आमदारांच्या पक्षाच्या बैठकीचे अध्यक्षपदही भूषवले.
कोविड महामारीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळले होंते. ऑन लाईन पद्धतीने ते बैठकांमध्ये उपस्थित राहात असत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका केली होती. पण त्याकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले. आज दोन वर्षांनंतर ते प्रत्यक्ष विधीमंडळ कामकाजात सहभागी झाले.
कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते नरसिंह मिश्रा यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री पटनायक कलिंगा स्टेडियममधील क्रीडा कार्यक्रमांना उपस्थित राहिले त्यासाठी ते विधानसभेसमोरील रस्त्यावरून गेले, परंतु सभागृहात आले नाहीत. काही जाहीर कार्यक्रमांनाही मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती, पण त्यांना विधानसभेत यायला वेळ मिळाला नाही असे ते म्हणाले.