पुणे : राष्ट्रवादी जात्यात, भाजप सुपात!

पुणे – राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजपचे वर्चस्व संपवत या पालिका ताब्यात घेण्याची तयारी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सुरू केली होती. त्यात प्रामुख्याने पुण्यात सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली होती.

अंतर्गत सर्वेक्षणात भाजप अडचणीत असल्याचा निष्कर्ष समोर आला होता. तर, अंतर्गत सर्वेक्षणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती मजबूत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे चार सदस्यांच्या प्रभागात वरचढ ठरलेल्या भाजपला रोखण्यासाठी दोनचे प्रभाग करण्याची मागणी शहर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्याकडे केली जात होती.

त्यातच राष्ट्रवादीकडे मोठ्या प्रमाणात भाजपचे नगरसेवक येण्याची शक्‍यता असल्याने या नगरसेवकांचे प्रभाग कायम ठेवत उर्वरित ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी केली होती. त्यामुळे दोन सदस्यांचा प्रभाग झाल्यास भाजपला फटका बसेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण, आजच्या निर्णयाने भाजपला दिलासा मिळणार आहे.

शहरात भाजपचे विद्यमान नगरसेवक पाहता, तसेच गेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत तेथे उमेदवार शोधण्याची धावपळ करावी लागणार नाही. याशिवाय, तीनच्या प्रभागातील मतदारसंख्या सुमारे 60 ते 65 हजार राहणार असल्याने भाजपला त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर, दोन सदस्यांच्या प्रभाग रचनेसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादीला या निर्णयाने धक्‍का बसला असून, भाजपला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.