मुंबई – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांच्या तडकाफडकी बदलीला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) बुधवारी स्थगिती दिली. मॅटचा हा निर्णय म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेली चपराक मानली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी बनगोसावी यांच्यासह विभागातील तीन अधीक्षक अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. विशेष म्हणजे हा आदेश काढताना विभागाने बनगोसावी यांच्या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीविषयक कायद्यातील तरतुदी धाब्यावर बसवल्या. प्रमोद बनगोसावी यांची 22 ऑक्टोबर 2021 रोजी अधीक्षक अभियंता म्हणून मुंबई मंडळात बदली झाली होती. मात्र, त्यांचा सेवेचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच विभागाने त्यांची बदली केली. या मुदतपूर्व बदलीमुळे बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळात मोठी खळबळ उडाली होती.
या पार्श्वभमीवर प्रमोद बनगोसावी यांनी विभागाच्या बदली आदेशाला मॅटमध्ये आव्हान दिले होते. मुंबई मंडळात जेमतेम दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली झाल्याने या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मॅटमध्ये देबाशिष चक्रवर्ती यांच्या पीठाने वस्तुस्थिती तपासून प्रमोद बनगोसावी यांच्या बदली आदेशाला स्थगिती दिली. या निर्णयामुळे मुदतपूर्व बदलीचा आदेश विभागाच्या अंगलट आला आहे. ऍड. अरविंद बांदिवडेकर यांनी मॅटमध्ये प्रमोद बनगोसावी यांची बाजू मांडली.