– विनोद मोहिते
इस्लामपूर – पहिल्या दिवसापासून क्षणा-क्षणा उत्कटता वाढविणारा..श्वास रोखायला लावणारा खेळाडूंचा खेळ प्रो कबड्डी, व महा कबड्डीसारखे शिस्तबध्द नियोजन..मुबईचे किशोर गावडे यांचे प्रभावी धावते समालोचन,आकर्षक प्रकाशझोत आणि के न्यूज या चॅनेलवरून थेट प्रक्षेपण यामुळे इस्लामपूर येथील जयंत प्रीमियर लीगला कबड्डी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्हा कबड्डी असोशियशनच्या मान्यतेने सुरू असलेली ही कबड्डी लीग दि.१९ पर्यंत चालणार आहे. राज्याचे नगर विकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपूरे यांच्या हस्ते बक्षिस वितरण केले जाणार आहे.
राज्याचे जल संपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त,इस्लामपूरचे नगरसेवक,जयंत स्पोर्ट्सचे संस्थापक खंडेराव जाधव यांची संकल्पना,व प्रयत्नातून ही लीग आयोजित केली आहे. इस्लामपूर येथील जयंत स्पोर्ट्स च्या मैदानावर ही लीग सुरू आहे.
पहिल्याच दिवशी झालेल्या पहिल्याच सामन्यात कासेगावचे उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या एस एल हरिकन्सने कामेरीचे माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या कै.जगदीश पाटील आप्पा रायडर्स या संघावर मात केली. हरिकन्सने पूर्वार्ध,व उत्तरार्ध लमध्ये प्रतिस्पर्धी संघावर एक-एक लोन चढवीत ५४ गुणांची लूट केली.
दुसऱ्या सामन्यात जुनेखेडचे सागर पाटील,नितीन कोळगे यांच्या स्फूर्ती रॉयल्स विरुध्द वाळव्याचे रविंद्र पाटील यांच्या राजेंद्र पाटील युवा फायटर्स,तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचा लोकनेते राजारामबापू पाटील ईगल्स,विरुध्द जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील,कृष्णेचे माजी संचालक ब्रह्मनंद यांचा नरसिंह चॅलेंर्स ( तांबवे) या संघातील सामने प्रत्येक चढाईला उत्कटता वाढविणारे ठरले. स्फूर्ती रॉयल्सने ३ गुणांनी,तर नरसिंह टायगर्सने २ गुणांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. कबड्डी प्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पहिल्याच दिवशी अगदी रात्री उशिरापर्यंत सामने चालले.
दररोज दुपारी ४ पासून रात्री उशिरापर्यंत सहा-आठ सामने होणार असून १५- १५ मिनिटांचे दोन भाग,व ५ मिनिटांची विश्रांती अशा वेळेत हे सामने खेळविले जात आहेत. हजारो कबड्डी प्रेमींच्या उपस्थिती,व प्रतिसादात सामने होत आहेत.
सागर जाधव,उमेश रासनकर, विजय देसाई,माजी नगरसेवक आयुब हवलदार,सचिन कोळी,स्वरूप मोरे,अंकुश जाधव,राजवर्धन लाड,हमीद लांडगे,जयकर पाटील साखराळे,प्रसाद कुलकर्णी,अजय थोरात,विजय महाडिक यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू,व कार्यकर्ते स्पर्धेचे उत्कृष्ठ संयोजन करीत आहेत.
के.न्यूजवरून थेट प्रक्षेपण
इस्लामपूर येथील के न्यूजवरून या कबड्डी लीगचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. के न्यूजवर २,५,६,व १०० क्रमांकावर हे प्रक्षेपण दिसत आहे. इस्लामपूर,वाळवा,आष्टा,संपूर्ण शिराळा,पलूस,तसेच तासगाव तालुक्यातील काही गावात हे प्रक्षेपण दिसत आहे.