शिलॉंग – देशभरात इंधन दरांचा भडका उडाला असताना मेघालयात मात्र पेट्रोल आणि डिझेल आणखी 5 रूपयांनी स्वस्त झाले आहे. त्या इंधनांवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याचे मेघालय सरकारचे पाऊल त्या राज्यातील जनतेसाठी दिलासादायक ठरले आहे. अर्थात, मालवाहतुकदारांच्या संपाची पार्श्वभूमीही त्या निर्णयाला आहे.
सार्वजनिक इंधन कंपन्यांकडून दरवाढीचे सत्र सुरू असल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, कुठली करकपात करून तूर्त जनसामान्यांना दिलासा देण्याच्या मुडमध्ये सरकार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपल्या अखत्यारीतील कर कमी करण्याचा राज्य सरकारांवरील दबाव वाढला आहे. त्याला मेघालयही अपवाद ठरलेले नाही. मेघालय सरकारने राज्यातील जनतेला काहीसा दिलासा देत मागील आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर 2 रूपयांनी कमी केले. मात्र, त्या निर्णयाने समाधान न झाल्याने त्या राज्यातील मालवाहतूकदारांनी सोमवारपासून संप सुरू केला. त्यापार्श्वभूमीवर, राज्य सरकारने इंधनांवरील व्हॅट दर कमी केला. त्या दोन निर्णयांमुळे मेघालयातील इंधन दर सुमारे 7 रूपयांनी खाली आले आहेत.