ऑफ साइडच्या चेंडूची छेडखानी नको
मुंबई – करोनापासून आपला व आपल्या कुटुंबीयांचा बचाव कसा करायचा याबाबत देशभरात अनेकांनी देशवासियांना आवाहन केले आहे. मात्र, क्रिकेटपटू इरफान पठाण याने क्रिकेटच्या परिभाषेत केलेल्या आवाहनला चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
करोना विषाणू म्हणजे जणू ऑफ स्टपंच्या बाहेर पडलेला चेंडू आहे. त्याला स्पर्श कराल तर बाद होण्याचा धोका आहे. जोवर आपण या चेंडूची छेडखानी करत नाही तो पर्यंत आपल्याला कसलाही धोका नाही. करोनाविरुद्धचा हा कसोटी सामना असाच आक्रमक फलंदाजी न करता संयमाने खेळ करुन आपण सहज जिंकू शकतो. ज्या प्रकारे क्रिकेटचा कसोटी सामना जर संघाचा पराभव होऊ नये या करता संयमाने खेळ करुन वाचविला जातो तसाच हा करोनाविरुद्धचा सामना चिकाटीने व संयमाने घरातच राहून वाचवू शकतो, अशी क्रिकेटची परिभाषा कथन करत पठाणने देशवासियांना घरातच थांबा, विनाकारण घराबाहेर निघू नका व करोनापासून आपला बचाव करा, असे आवाहन केले आहे.