रोम : इटलीच्या दक्षिण किनारपट्टीजवळ दोन जहाजे दुर्घटनाग्रस्त होऊन किमान ११ जणांचा बुडून मृत्यू झाला. तर तब्बल ६४ जण बेपत्ता झाले आहेत. यातील एका दुर्घटनेतील ११ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना कॅलाब्रियन शहराच्या किनाऱ्यापर्यंत आणले गेले आहे. ही दुर्घटना सोमवारी घडली. तर फुटून दुर्घटनाग्रस्त झालेल्या आणखी एका जहाजामध्ये बचाव पथकाला १० मृतदेह आढळले आहेत. लॅम्पेदुसा बेटाजवळ ही लाकडी बोट दुर्घटनाग्रस्त झाली होती. मरण पावलेले सर्व शरणार्थी असावेत, असा अंदाज आहे. पहिली दुर्घटना कॅलाब्रिया शहरापासून २०० किलोमीटर अंतरावर घडली. आठ दिवसांपूर्वी शरणार्थ्यांना घेऊन ही बोट तुर्कीयेवरून निघाली होती. बोटीला आग लागून नंतर ही बोट उलटली होती, असे संयुक्त राष्ट्राच्या मदत एजन्सीने सांगितले. ही फ्रेंच बोट दुर्घटनाग्रस्त झाली असल्याचा संदेश मिळाल्यावर इटली आणि ग्रीसच्या तटरक्षक दलांनी शोध आणि बचाव मोहिमेला प्रारंभ केला. या बोटीतील अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये इराण, सीरिया, इराकमधील शरणार्थी असल्याचे बचाव पथकांनी सांगितले. तर दुसऱ्या घटनेतल्या बोटीमध्ये ६१ जण प्रवासी करत होते. बोटीमध्ये पाणी भरले गेले होते. डेकच्या खालीत तळघरात अडकलेल्या १० जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरित ५१ जणांना वाचवण्यात आले.