शिमला – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेले 58 वर्षीय सुखविंदरसिंह सुखे हे सामान्य गरीब घरातून पुढे आलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांचे वडिल हिमाचल परिवहनमध्ये ड्रायव्हर होते. ते स्वतः लहानपणी दूध टाकायचे काम करायचे. कष्टाने त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ते एमए आणि एलएलबी झाले आहेत.
विद्यार्थी दशेत ते एनएसयुआय या कॉंग्रेसप्रणित विद्यार्थि संघटनेत कार्यरत होते. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्व घडले. सिमला महानगर पालिकेत ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. 2003 साली त्यांनी नाहोद विधानसभा मतदार संघातून प्रथम विधानसभेवर निवडून आले. प्रदेश कॉंग्रेसमध्ये पहिल्यांदा सरचिटणीस आणि नंतरच्या काळात ते प्रदेशाध्यक्ष झाले.
2007 सालीही ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले. मात्र सन 2012 च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी 2017 आणि 2022 मध्ये त्यांना पुन्हा विधानसभेची निवडणूक जिंकली.
प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी ग्रामीण स्तरावरही पक्षाला मजबूत करण्याचे काम केले. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले. त्याच काळात त्यांच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या विधानसभेची तिकीटे मिळाली. त्याचवेळी कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर पडेल, असे भाकित वर्तवले गेले होते. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.