नवी दिल्ली – जागतिक अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक इतर बाजाराकडे वळू लागल्यामुळे सोन्याच्या दरातील घसरण चालूच आहे. दिल्ली सराफात सोन्याचा दर 37 रुपयांनी कमी होऊन 46,417 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर तब्बल 332 रुपयांनी कोसळून 63,612 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,815 डॉलर तर चांदीचा दर 24.50 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे डॉलर वधारत आहे. त्याच बरोबर शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत.
त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. मात्र भारतामध्ये सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर असल्यामुळे उत्सव आणि लग्नासाठी सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे असे समजले जाते.