वॉशिंग्टन – निवडणुकीतील पराभवामुळे सैरभैर झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज आपले संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांची हकालपट्टी करून आपला राग त्यांच्यावर काढला आहे. त्यांच्या जागी ख्रिस्तोफर मिलर यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
ख्रिस्तोफर मिलर हे दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक आहेत. ते तातडीने संरक्षण मंत्री म्हणून सूत्रे हाती घेत आहेत अशीा घोषणा ट्रम्प यांनी ट्विटरवर केली आहे. मार्क ईस्पर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
पण त्याचे कारण मात्र त्यांनी दिलेले नाही. हकालपट्टी झालेले संरक्षण मंत्री ईस्पर यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण अध्यक्षांचे होयबा म्हणून काम करीत नाही असे म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरचा निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे.