ABP CVoter Opinion Poll: छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सोमवारी (9 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभेच्या 90 जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार हे सर्व काही स्पष्ट होणार आहे. निवडणुकीपूर्वी एबीपी न्यूज सी व्होटर ओपिनियन पोल जाहीर झाला आहे.
ओपिनियन पोलमध्ये कोणाला किती मते मिळतात?
सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार सरकारची धुरा सांभाळणाऱ्या काँग्रेसला 45 टक्के मते मिळू शकतात. त्याचवेळी विरोधी पक्ष भाजपला 44 टक्के मते मिळू शकतात. म्हणजे मतांच्या बाबतीत काँग्रेस भाजपपेक्षा किंचित पुढे आहे. 11 टक्के मतदान इतरांच्या खात्यात जाऊ शकते.
छत्तीसगडमध्ये कोणाला किती जागा?
ओपिनियन पोल डेटावर विश्वास ठेवला तर काँग्रेसला 45 ते 51 जागा मिळू शकतात तर भाजपला 39 ते 45 जागा मिळू शकतात. इतरांना त्यांच्या खात्यात शून्य ते दोन जागा मिळू शकतात. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा 90 आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे. छत्तीसगडमधील विद्यमान काँग्रेस सरकारचे नेतृत्व भूपेश बघेल करत आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराममध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. एबीपी न्यूज सी व्होटर ओपिनियन पोल मध्ये सुमारे 90 हजार लोकांशी बोलले गेले आहे. हे सर्वेक्षण 1 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे.