मुंबई – राज्यात सध्या कंबल बाबांची चांगलीच चर्चा रंगली आहे. रुग्णावर उपचार करत असल्याचा दावा करत या बाबाने सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यात आता भाजप आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनीही या कंबल बाबाला (kambal baba) उपाचारासाठी मुंबईत बोलावले आहे. त्यामुळे राम कदम यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इतकेच नाही राम कदम यांनी या बाबांचा व्हीडिओ देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामुळे या बाबाविषयी कुतूहल वाढले आहे.
कंबल-बाबांचा व्हीडिओ सध्या व्हायरल
आमदार कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल-बाबांचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या बाबावर तसेच राम कदम यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
अंनीसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी –
कंबलबाबा या भोंदूबाबावर पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करावा व पीडित व्यक्तींची ही क्रूर थट्टा थांबवावी असेही अंनीसने ( Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंबल बाबामुळे कदम चांगलेच चर्चेत होते. कदम यांनीच या कंबल बाबांना मुंबईत पाचारण केले आहे.
उपचार घेण्याचे कदमांचे यांचे आवाहन
अर्धांगवायूचा झटका आलेले रुग्ण, कंबर आणि गुडघ्याचे दुघणे आदीने त्रस्त असलेले रुग्ण यांनी कंबल बाबाकडून उपचार घ्यावेत, असे आवाहन राम कदम यांनी केले आहे. त्या नंतर लोकांनीही कंबल बाबांकडून उपचार करवून घेण्यासाठी बरीच गर्दी केली होती. ते व्हीडिओदेखील आमदार कदम यांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.