बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – मार्केट यार्ड येथील पदपथावरील फिरस्त्या विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्यात येऊन पादचाऱ्यांसाठी पदपथ रिकामे करण्यात आले. परंतु, बिवेवाडी परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी वाचनालये, आधार कार्ड सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नागरिक सुविधा सेंटर अशा गोंडस नावांखाली पालिकेच्याच निधीतून बांधकामे करण्यात आली असून काही जागा पाणीपुरी, टायर दुकाने यांना चालविण्यास दिल्याचे निदर्शनास येत आहे.
महानगरपालिकेच्या निधीतून खर्च करून पदपथावर, मोकळ्या जागेमध्ये गोंडस नावाखाली करण्यात आलेल्या “विकासकामांत’ थेट दुकानदारी सुरू असून या जागा विक्रेत्यांना (भाडे आकारून) दिल्या जात असल्याचे चित्र प्रभागात सर्वत्र आहे. एकीकडे रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करायची आणि दुसऱ्या बाजुला अशाच विक्रेत्यांना पदपथावरील जागा द्यायच्या, अशा “धंदा’ सुरू असून याला नक्की कोणाचे पाठबळ मिळत आहे? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. अशा “विकासकामांत’ अतिक्रमण करणाऱ्यांवर महानगरपालिका कारवाई करणार का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
के.के. मार्केट जवळ सुरू करण्यात आलेल्या नागरी सुविधा सेंटरचा विसर महापालिकेला पडला असावा तेथे नक्की काय सुरू आहे, याची पाहणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावी. याबाबत येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार जागृत राहून उत्तर देतील.
– संतोष नांगरे, अध्यक्ष, पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
महावीर इलेक्ट्रॉनिक्स समोर पालिकेच्या जागेत सार्वजनिक वाचनालय सुरू होते. मात्र, सध्या तेथे पाणीपुरी भेळपुरीचे दुकान सुरू आहे, संबंधित प्रकरणाची तक्रार प्रशासनाकडे देऊनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही.
– विशाल शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महानगपालिकेच्या जागेत बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आलेले असेल तर सदर अतिक्रमण तातडीने हटवून संबंधीतांवर कारवाई केली जाईल. याबाबत तातडीने माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.
– गणेश सोनुने, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय