वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अंतीम टप्प्यात आले असतानाच वातावरणात तणाव मात्र कमालीचा वाढला आहे. गेल्या तीन दिवसांत ट्रम्प यांचे सशस्त्र समर्थक व्हाईट हाऊस कोण जिंकणार, हे ठरवणाऱ्या मतमोजणी केंद्राबाहेर ठिय्या मांडून आहेत.
काही जण शॉटगन घेतली आहे. तर काही जणांच्या हातात हॅंडगन आहे. काही जणांकडे लष्करात वापरतात तशा अर्धस्वयंचलित रायफली आहेत. त्यामुळे निकालानंतर काय होणार याची भीती सामान्य अमेरिकन नागरिकांच्या मनात आहे.
निदर्शकांमधील फारच कमी संख्येने सशस्त्र असले तरी परिस्थिती चिंताजनक आहेच. ऍरिझोना, नेवेडा आणि मिशीगनमध्ये हा प्रकार पहायला मिळत आहे. तेथे कायद्याने शस्त्र बाळगायला परवानगी आहे. मात्र अद्याप कोठेही गोळीबार झाल्याची नोंद नाही.
बहुतांश उजव्या गटाच्या समर्थकांकडे शस्त्रे दिसत असली तरी काही डाव्या समर्थकांकडेही शस्त्रे आहेत. त्यामुळे जर हिंसाचार उफाळला तर चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत. “अनेक लोक ही सामान्य स्थिती असल्याचे शांत आहेत. पण, आपण बारकाईने पाहिले तर ही स्थिती सामान्य नाही, यात सामान्य वाटण्याजोगे काहीच नाही, असे अमेरिकन विद्यापीठात दहशतवाद हा विषय शिकवणाऱ्या कॅंथिया मिलर-इद्रिस म्हणाल्या.
मतमोजणीत कोणताही गंभीर आक्षेप नोंदवला गेला नसतानाही डेमोक्रॅट पक्ष ही निवडणूक प्रक्रियेचे अपहरण करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर सशस्त्र निदर्शकांची संख्या झपाट्याने वाढली. डेमोक्रॅट पक्षाचे ज्यो बायडेन आघाडीवर असणाऱ्या राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदान केंद्राबाहेरचे वातावरण पाहिल्यानंतर आम्हाला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी शस्त्रे बाळगणाऱ्यांनी शांतता राखावी, असे अवाहन केले आहे.
फिनिक्स निवडणूक केंद्रावर शेकडो कर्मचारी मतमोजणी करत आहेत. तेथे सुमारे 100 ट्रम्प समर्थक गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. “आम्ही त्यांना येथून काहीही घेऊन जाऊ देणार नाही. सर्व कायदेशीर मतांची मोजणी व्हावी. ती नि:पक्ष असावी, यवढेच आमचे म्हणणे आहे, असे 34 वर्षीय सशस्त्र निदर्शक ट्रवीस फिलमोर याने सांगितले.
ट्रम्प यांना आणखी चार वर्ष संधी द्या, निवडणूक कर्मचाऱ्यांना अटक करा, अशा घोषणा निदर्शक देत आहेत. त्यांना मतदान केंद्रापासून अंतरावर रोखण्यात आले आहे. डेट्रॉईटमध्येही शेकडो समर्थक मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमा झालेत. तेथेही मतचोरी रोखा, अशा घोषणा ट्रम्प समर्थक देत आहेत. स्वच्छ वातावरणात पुन्हा निवडणूक घ्या, आम्ही ट्रम्प यांचे चाहते आहोत, अशा घोषणा देत आहेत. पोलिसांनी मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते रोखून धरले आहेत.