नगर | जिल्ह्यात आता कडकडीत बंद; केवळ वैद्यकीय सेवेलाच असेल मुभा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नगर, दि. 30 (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात घोषीत करण्यात आलेला ‘जनता कर्फ्यु’त लोकांनी निर्बंध पाळले नाहीत. राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमध्येही तीच अवस्था राहिली. अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी लोक जत्रेसारखे बाहेर पडत आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरत असल्याने आता कडकडीत बंदच पाळावा लागेल, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज स्पष्ट केली.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे येथे भेटी देऊन तेथील करोनाविषयक स्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सद्यस्थिती, रोज वाढणारी करोनाबाधितांची संख्या, रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठा आदीबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली.

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, आमदार रोहीत पवार, आमदार संग्राम जगताप, आमदार बबनराव पाचपुते, आमदार किरण लहामटे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदींसह अधिकारी यावेळी उपस्थि होते.

पालकमंत्री म्हणाले, करोना रोखण्यासाठी कडक निर्बधांशिवाय गत्यंतर नाही. मागील लॉकडाऊनचे काहीही फलीत झाले नाही. सकाळी 7 ते 11 या वेळेत लोकांना अत्यावश्यक गरजेच्या वस्तु खरेसाठी मुभा दिली. मात्र. या वेळेत लोकांचे लोंढेच बाहेर पडले. ते जत्रेसारखे फिरले. त्यामुळे आता आरोग्यसेवा वगळता इतर सर्वच सेवा पूर्णवेळ बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. पुढील 14 दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन करावे लागणार आहे.’’

मुश्रीफ यांनी आज श्रीरामपूर येथे आढावा बैठक घेतली. त्यानंतर नगरमध्ये त्यांनी ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. नगर, संगमनेर व श्रीरामपूरमध्ये ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे, असे ते म्हणाले. तसेच शिर्डीत लवकरच दोन हजार बेडचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्याचा विचार प्रस्ताव असून, तेथे दोनशे बेडला आयसीयु सुविधा असेल. एक हजार बेड्सला ऑक्सिजन सुविधा दिली जाईल, असे ते म्हणाले

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.