करोनाच्या उपाययोजनांमध्ये आणखी सुधारणांची गरज

  • डॉ.  अमोल कोल्हे यांच्या प्रशासनाला सूचना – जम्बो, ऑटो क्‍लस्टर रुग्णालयाला भेट

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिका करोना विषाणूबाबत चांगले काम करत आहे. आयसोलेट रुग्णांची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासोबतच ऑक्‍सिजनचे ऑडिट झाले पाहिजे. प्रशासन चांगले काम करत असले तरी काही बाबतीत पालिका प्रशासनाला आणखी सुधारणा करणे आवश्‍यक असल्याचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

पिंपरी चिंचवड शहरातील जम्बो कोविड केअर सेंटर व ऑटो क्‍लस्टर रुग्णालयाला आज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली. तसेच महापालिकेच्या वॉर रुमला भेट देत आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघरे, नगरसेवक योगेश बहल आदी उपस्थित होते.

खासदार कोल्हे म्हणाले, जम्बो कोविड सेंटर व ऑटो क्‍लस्टर रुग्णालयाला आज भेट दिली. तेथील प्रशासनाकडून रुग्णांना काय सुविधा दिल्या जातात याची माहिती घेतली आहे. तसेच वॉर रुमचीही पाहणी केली आहे. एकंदरितच पालिका प्रशासनाचे काम समाधानकारक आहे. मात्र यामध्ये आणखी सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासोबतच खासगी रुग्णालयांचे ऑक्‍सिजन ऑडिट करणे आवश्‍यक आहे.

मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांवर कारवाई होणारच
स्पर्श हॉस्पिटलच्या चुकीच्या कामाच्या कंत्राटामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा सहभाग असलेबाबत विचारले असता खासदार कोल्हे म्हणाले, चुकीच्या कामांमध्ये सामील होऊन मयताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. त्याबाबत आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. चुकीच्या कामांची चौकशी करण्यात यावी. चौकशीअंती जे समोर येईल त्यानुसार योग्य ती कारवाई संबधित नगरसेवकावर केली जाईल.

आजही महाराष्ट्र दीड कोटी लसीकरणासह देशात नंबर एकच्या स्थानावर आहे. असे असताना देखील लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. लसीचा पुरवठा होणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. 18 ते 45 वर्षाच्या नागरिकांना लसीकरणाबाबत घोषणा झाली असली तरी तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार का याबाबत साशंकता आहे. एकंदरतिच केंद्र सरकारचा लसीकरणाबाबत व करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत असलेला दृष्टीकोन हा घोळ निर्माण करणारा आहे. ही दुर्देवाची गोष्ट आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.