शेवगाव – चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या वडिलांना न्याय मिळावा, यासाठी त्यातील आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी 20 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी शेवगाव ठाण्यातील पोलीस नाईक संतोष चंद्रकांत काकडे (वय 36) या लाचखोराविरूद्ध मंगळवारी रात्री उशीराने गुन्हा दाखल झाला आहे.
शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तक्रारदारांच्या वडिलांचा अपघात होऊन मृत्यू झाला. या अपघातातील आरोपी वाहन चालकाचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस नाईक संतोष चंद्रकांत काकडे याने तक्रारदाराकडे दि. 13 जानेवारी 2023 रोजी 20 हजार रुपयाची लाच मागीतली होती.
पोलीस कर्मचाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदारांनी याबाबतची माहिती नाशिकच्या लाचलुचपतच्या पथकाला दिली. या तक्रारीनंतर सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांनी कारवाई करीत पो. ना. संतोष चंद्रकांत काकडे याच्याविरुद्ध लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपतच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि. साधना इंगळे, पो.ह. सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, चंद्रशेखर मोरे, पो.ना. मनोज पाटील, चालक पो. ह. विनोद पवार यांच्या पथकाने केली.
मागील अनेक दिवसांपासून शेवगाव पोलीस ठाणे लाचलुचपतच्या निशान्यावर होते. तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात जनतेची कामे करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते. पैसे दिले नाही तर काम केले जात नाही. असे होत असल्याचे लाचलुचपत विभागाच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावेळी केले आहे.