हॅमिल्टन – फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात सरस कामगिरी करत यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 134 धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला. पहिल्या डावात 251 धावांची खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन सामन्याचा मानकरी ठरला.
पहिल्या डावात विल्यमसनची द्विशतकी खेळी व टॉम लॅथमचे अर्धशतक यांच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने 7 बाद 519 असा धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरादाखल पहिल्या डावात विंडीजची सुरुवातच खराब झाली. टीम साऊदी, जेमिन्सन, वॅगनर यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट, जॉन कॅंपबेल, ब्लॅकवूड, कर्णधार होल्डर यांनी पहिल्या डावात थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्नही तोकडेच पडले. 138 धावांवर पहिला डाव आटोपल्यानंतर न्यूझीलंडने विंडीजला फॉलोऑन दिला.
दुसऱ्या डावातही विंडीजची सुरुवात खराब झाली. 6 बाद 89 अशी परिस्थिती असताना मधल्या फळीत ब्लॅकवूड आणि जोसेफ यांनी 155 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. ब्लॅकवूडने 104 तर जोसेफने 86 धावांची खेळी केली; परंतु न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर ते देखील फारकाळ तग धरू शकले नाहीत. अखेरीस 247 डावांवर विंडीजचा दुसरा डाव संपवत न्यूझीलंडने सामन्यात बाजी मारली.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव – 145 षटकांत 7 बाद 519 घोषित. वेस्ट इंडिज पहिला डाव – 64 षटकांत सर्वबाद 138. वेस्ट इंडिज दुसरा डाव – 58.5 षटकांत सर्वबाद 247 धावा. (जेरेमी ब्लॅकवूड 104, अल्झारी जोसेफ 86, नेल वॅगनर 4-66, काएल जेमिसन 2-42).