#AUSAvINDA : सराव सामन्यात रहाणेचे नाबाद शतक

भारत अ संघाच्या 8 बाद 237 धावा

सिडनी – भारतीय संघाचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज अजिंक्‍य रहाणेला अखेर सूर गवसला. त्याने नाबाद शतकी खेळी करताना चेतेश्‍वर पुजाराच्या अर्धशतकी साथीच्या जोरावर भारत अ संघाला ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात 8 बाद 237 धावांची मजल मारून दिली. कसोटी सामन्यांची मालिका पाहता रहाणेला गवसलेला सूर भारतीय संघासाठी दिलासादायक गोष्ट ठरली आहे. 

यंदाच्या मोसमात रहाणेला आपल्या दर्जाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेतही त्याला फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. ही सर्व कसर हा सराव भरून काढताना त्याने दमदार नाबाद शतकी खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना चेतेश्‍वर पुजाराने अर्धशतकी खेळी केली. या व्यतिरक्त संघातील प्रमुख फलंदाजांनी मात्र निराशा केली.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रहाणे 108 धावावंर तर, महंमद सिराज शून्य धावांवर नाबाद आहेत. कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या रहाणेने आपली जबाबदारी ओळखून दरदार खेळ केला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळत असताना रहाणेच्या नेतृत्वाखाली भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघात 3 दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली.

या सराव सामन्यात भारताने पृथ्वी शॉ व शुभमन गिल यांना मिळालेल्या संधीचा लाभ घेता आली नाही. 3 बाद 40 अशी बिकट अवस्था असताना रहाणे व पुजारा जोडीने शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पुजारा 54 धावांची खेळी करून बाद झाला. रहाणेने संघाला द्विशतकी धावांचा पल्ला गाठून दिला.

संक्षिप्त धावफलक –

भारत अ पहिला डाव – 90 षटकांत 8 बाद 237 धावा. (चेतेश्‍वर पुजारा 54, उमेश यादव 24, अजिंक्‍य रहाणे नाबाद 108, जेम्स पॅटिन्सन 3-58, ट्रेविस हेड 2-24, मिचेल नेसर 2-51).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.