वेलिंग्टन – न्यूझीलंडमध्ये प्रियांका राधाकृष्णन् यांची मंत्री म्हणून निवड करण्यात आली. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी पाच नव्या सदस्यांची निवड केली. हा सन्मान प्रथमच भारतीय वंशीयाला मिळाला आहे.
भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन यांनी सिंगापूरमध्ये शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्या पुढील शिक्षण त्यांनी न्यूझीलंडमध्ये घेतले. शोषित वर्गावरील अन्याय, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांचे प्रश्न, विस्थापितांचे होणारे शोषण याविरोधात आवाज उठवण्यात त्या अग्रभागी असतात. किंबहुना हेच त्याचे जीवितध्येय आहे.
लेबर पक्षाकडून त्या 2017 मध्ये संसदेत निवडून आल्या. 2019 मध्ये त्यांना वांशिक समाजाच्या मंत्र्याचे खासगी सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या क्षेत्रातील कामांमुळे त्यांना विविधता, समावेश आणि वांशिक समुदाय मंत्रालयाचा कार्यभार सांभाळण्याचा त्यांचा पाया रचला गेला. याशिवाय त्यांच्याकडे समाज विकास आणि रोजगार मंत्रालयाच्या उपमंत्री पदाचाही कार्यभार सोपवण्यात आला आहे.
प्रियांका यांचे आजोबा हे डाव्या पक्षांशी संबंधित होते. केरळ राज्याच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे मूळ गाव एर्नाकुलम आहे. त्यांनी वेलिंग्टन विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. माजी वांशिक समुदाय मंत्री जेनी सलेसा यांच्या व्यक्तिगत सचिव म्हणून त्यांनी 14 वर्षे काम पाहिले. त्यांचे पती रिचर्डसन हे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची मंत्रिमंडळात निवड झाल्यावर त्यांनी पिवळ्या रंगाच्या साडीतील छायाचित्र फेसबुकवर अपलोड केले.