आबूधाबी – सलामीवीर देवदत्त पडीक्कलच्या अर्धशतकी व एबी डी विलियर्स आणि विराट कोहली यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्स विरूध्दच्या सामन्यात 20 षटकांत 7 गडी गमावत 152 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूस प्रथम फलंदाजीस बोलावलं. त्यानंतर बेंगळुरूची धावसंख्या 25 असताना कगिसो रबाडाने जोश फिलिपला शाॅ करवी झेलबाद करत पहिला धक्का दिला. जोश फिलिपने 12(17) धावांची खेळी केली. त्यानंतर पडीक्कल आणि विराटने दुसऱ्या विकेटसाठी 57 धावा जोडल्या. विराट कोहलीला 29(24) धावांवर रविचंद्रन अश्विनने मार्कस स्टोईनिसकरवी झेलबाद करत बेगळुरूस दुसरा धक्का दिला.
त्यानंतर देवदत्तने अर्धशतक पूर्ण करताच ऐनरिक नाॅटर्जने त्याला त्रिफळाचित करत बेंगळुरूला तिसरा धक्का दिला. पाठोपाठ क्रिस माॅरिसलासुध्दा शून्यावर ऐनरिक नाॅर्टजेने माघारी धाडत बेंगळुरला चौथा धक्का दिला. त्यानंतर शिवम दुबे आणि एबीडी विलियर्सने संघाची धावसंख्या दीडशेजवळ नेली. दुबेला 17(11) धावांवर कगिसो रबाडाने तर एबीडी विलियर्सला 35(21) धावांवर अंजिक्य रहाणेने धावबाद केलं. त्यानंतर इसुरू उदानाने नाबाद 4 तर शाहबाज अहमदने 1 धाव करत संघाची धावसंख्या 152 पर्यंत नेली.
दिल्लीकडून ऐनरिक नाॅर्टजेने 4 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 3 तर कगिसो रबाडाने 4 षटकांत 30 धावा देत 2 गडी बाद केले. रविचंद्रन अश्विनने 4 षटकांत 18 धावा देत 1 गडी बाद केला.