उत्तर प्रदेशातील सात मतदारसंघात उद्या मतदान; 88 उमेदवार अजमावणार नशीब

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभेच्या सात मतदारसंघांमध्ये उद्या 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकांचे मतदान होणार आहे. ज्या सात मतदारसंघात हे मतदान होत आहे त्यातील सहा जागा भारतीय जनता पक्षाकडे होत्या तर एक जागा समाजवादी पक्षाकडे होती.

या सात मतदारसंघांमध्ये एकूण 88 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या आगामी वाटचालीसाठी या पोटनिवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्या राज्यात हाथरस, बलरामपूर येथील बलात्कार व हत्या प्रकरणांमुळे त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीबाबत सार्वत्रिक ओरड झाली आहे.

त्यामुळे त्या निवडणुकांच्या यशापयशावर योगी सरकारचे आगामी विधानसभा निवडणुकीतील भविष्य निश्‍चित होणार आहे किंबहुना त्यातून राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहात आहे याचे दिशादर्शन मिळेल, असे मानले जात असल्याने या पोटनिवडणुकांना महत्त्व आले आहे.

माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांच्या निधनामुळे नौगाव सादत मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. तेथे भाजपने चेतन चौहान यांच्या पत्नी संगीता चौहान यांना उमेदवारी दिली आहे. चेतन चौहान हे योगींच्या सरकारमध्ये मंत्री होते.

याच सरकारमधील विद्यमान मंत्री कमलरानी वरुण यांचेही निधन झाल्याने त्यांच्या घाटमपूर मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून तुंडला मतदारसंघातील आमदार एस. पी. सिंह बघेल यांची लोकसभेवर निवड झाल्याने त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.

बुलंदशहर, देवरिया आणि मल्हानी या मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्याने तेथेही या पोटनिवडणुका घ्याव्या लागत आहेत.  या मतदारसंघांमधील मतमोजणी 10 नोव्हेंबरला होईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.