ऑकलंड :- न्यूझीलंडचा कर्णधार व अव्वल खेळाडू केन विल्यमसन याला दुखापतीच्या कारणामुळे भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला सामना खेळत असतानाच त्याच्या पायाला दुखापत झाली व त्याला स्पर्धा सोडून मायदेशी परतावे लागले होते. यातून तो सावरत असला तरीही आता न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने त्याला दोन आठवड्यांचा कालावधी दिला असून तोपर्यंत त्याने तंदुरुस्ती सिद्ध केली तरच त्याची संघात निवड होणार आहे.
दरम्यान, 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत विल्यमसनच्याच नेतृत्वात न्यूझीलंडने उपविजेतेपद मिळवले होते. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने –
भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला भारत आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने असतील. यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघ 15 ऑक्टोबरला पाकिस्तानशी भिडणार आहे. भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.