NZ vs SA 2nd Test, Kane Williamson Records : शुक्रवारी संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या हॅमिल्टन कसोटीत न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसननेही पुन्हा एकदा आणखी एक शतक झळकावले. गेल्या 11 डावातील त्याचे हे 7 वे शतक आहे. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील एकूण 32 वे शतक आहे.
या दमदार शतकामुळे त्याने कसोटीतील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आता सर्वात कमी डावात 32 वे शतक पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. या बाबतीत त्याने स्टीव्ह स्मिथ, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.
विल्यमसनने कारकिर्दीतील 172व्या कसोटी डावात 32वे शतक झळकावले. तर स्टीव्ह स्मिथने 174 डावात, रिकी पाँटिंगने 176 डावात आणि सचिन तेंडुलकरने 179 डावात आपले 32 वे कसोटी शतक झळकावले होते. यासह, त्याने सध्या क्रिकेट खेळत असलेल्या सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ (32) याच्याशी बरोबरी साधली आहे. यानंतर ज्यो रूट (30 शतके) आणि विराट कोहली (29) यांचा नंबर लागतो. फॅब फोरमध्ये त्यांन कोहली-रुटला मागे टाकले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण…
या काळात केन विल्यमसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18 हजार धावांचा टप्पा पार करणारा केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज आहे. न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रम रॉस टेलरच्या नावावर आहे, ज्याने 18,199 धावा केल्या आहेत.
या बाबतीतही मिळवले अव्वल स्थान…
हॅमिल्टन कसोटीच्या चौथ्या डावात केन विल्यमसनने आपले 32वे शतक पूर्ण केले. कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावातील हे त्याचे 5वे शतक ठरले. या बाबतीतही तो आता अव्वल ठरला आहे. त्याने पाकिस्तानच्या युनूस खानची बरोबरी केली आहे. युनूस खानच्या नावावर कसोटी सामन्यांच्या चौथ्या डावातही एकूण 5 शतके आहेत. सुनील गावसकर (4), रिकी पाँटिंग (4) आणि ग्रॅम स्मिथ (4) या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
सात कसोटीत सातवे शतक…
केन विल्यमसनने गेल्या सात कसोटीत सातवे शतक झळकावले आहे. केन विल्यमसनने गेल्या वर्षी दुखापतीनंतर पुनरागमन केले आणि तेव्हापासून तो दमदार कामगिरी करत आहे. केन विल्यमसनच्या गेल्या सात सामन्यांतील धावसंख्येबद्दल बोलायचे तर त्याने इंग्लंडविरुद्ध मॅचमध्ये 4 आणि 132 धावा केल्या होत्या. यानंतर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 1-121 आणि 215 धावा केल्या. तर बांगलादेशविरुद्ध त्याने 104-11 आणि 13-11 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत त्याने शतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, केनने पहिल्या कसोटीत 118-109 धावा आणि दुसऱ्या सामन्यात 43-133 धावा केल्या.