ICC Men’s Test Batting Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन याने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. हैदराबादमध्ये भारताविरूध्द इंग्लंडचा विजय आणि ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील बरोबरीत सुटलेल्या मालिकेनंतर पहिल्या 10 मध्ये किरकोळ फेरबदल झाला असला तरी पहिल्या दहा फलंदाजांमध्ये फक्त एका भारतीयाचा समावेश आहे.
– कोहलीला एक स्थानाचा फायदा
– रोहितसह शुभमन गिल-श्रेयस अय्यरची घसरण
भारताचा अनुभवी विराट कोहली हा 767 गुणासह सहाव्या क्रमांकावर असलेल्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये एकमेव भारतीय आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या डावात 196 धावा करणारा इंग्लंडचा ऑली पोप 20 स्थानांनी झेप घेत 15व्या स्थानावर पोहोचला आहे. पोपचा इंग्लंडचा सहकारी बेन डकेटनेही आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. भारताविरुद्ध 35 आणि 47 धावांची खेळी खेळल्यानंतर त्याने पाच स्थानांची प्रगती करत 22 वे स्थान पटकावले आहे.
याव्यतिरिक्त इंग्लंडचा जो रूट हा 832 गुंणासह दुसऱ्या, आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 818 गुणांसह तिसऱ्या न्यूझीलंडचा डॅरेल मिशेल 786 गुणांसह चौथ्या तर पाकिस्तानचा बाबर आझम 768 गुणांसह पाचव्या क्रमाकांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने वेस्ट इंडिजविरुद्ध गाब्बा येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने दोन स्थानांची सुधारणा करत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे.
रोहितसह शुभमन -श्रेयसची घसरण…..
भारतीय कसोटी संघाच कर्णधार रोहित शर्मा 729 गुणासह 12 व्या क्रमांकावर आहे. त्याची एका स्थानाने घसरण झाली आहे. त्याने इंग्लंड विरूध्दच्या कसोटीत पहिल्या व दुसऱ्या डावात अनुक्रमे 24 आणि 39 धावा केल्या होत्या. शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना नुकसान झाले आहे. या दोन्ही खेळाडूंना अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचा फटका त्यांना आयसीसी क्रमवारीत बसला आहे.
अय्यरची (533 रेटिंग) 6 स्थानांची घसरण झाली आहे. तो आता 48व्या स्थानावर आला आहे. दुसरीकडे शुभमन गिल 52 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला तीन स्थानांचे नुकसान झाले आहे. त्याचे रेटिंग 509 आहे. अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 35 धावा आणि दुसऱ्या डावात 13 धावा केल्या. तर गिल पहिल्या डावात 23 धावांवर बाद झाला आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.