222 जणांची प्रकृती चिंताजनक
पुणे – शहरात करोनाचे नवे 305 बाधित सापडले आहेत. तर दुसरीकडे अत्यवस्थ बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, 222 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 49 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात 142 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात बाधितांची एकूण संख्या 9 हजार 82 इतकी झाली आहे. दिवसभरात 2, 249 संशयितांचे नमुने घेण्यात आले आहेत. सध्या शहरात 2, 733 बाधित सक्रिय आहेत. त्यातील डॉ. नायडू आणि अंतर्गत खासगी रुग्णालयांत 1,849 बाधित उपचार घेत आहे. ससून-141, खासगी रुग्णालयात 743 बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, 7,978 जण क्वारंटाइन आहेत.
आणखी 12 जणांचा मृत्यू
शुक्रवारी दिवसभरात शहरात 12 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, त्यातील एक जण सोलापूर जिल्ह्यातील आहे. तर अन्य 11 जण पर्वती, कोंढवा, गुलटेकडी, कसबा पेठ, बिबवेवाडी, कॅम्प, धनकवडी, कात्रज या परिसरातील रहिवासी होते. त्यामध्ये 6 महिला आणि 5 पुरूषांचा समावेश असून, वयवर्षे 46 ते 79 या वयोगटातील आहे. मृतांमध्ये चार व्यक्ती उशिरा रुग्णालयात आल्यामुळे त्यांचा 24 तासांत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर काहींना जुने आजार होते.