नेवाशात थरार; ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

अहमदनगर – नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीच्या सदस्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्याचा प्रकार घडला आहे. संकेत भाऊसाहेब चव्हाण असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले असून हल्ला कोणत्या कारणातून झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

गोळीबारात चव्हाण गंभीर जखमी झाले असून नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले व उपचार चालू करण्यात आले. गोळाबाराप्रकरणी शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत भाऊसाहेब चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूरकडे जात होते. रस्त्यात एका ठिकाणी ते लघुशंका करण्यासाठी थांबले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. चव्हाण यांच्या पोटावर, हातावर, पायावर गोळ्या लागल्याचे दिसून आले.

चव्हाण यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या शरीरातून तीन गोळ्या काढण्यात आल्या. मात्र, गोळ्या लागून गेल्याच्या आणखी काही जखमा त्यांच्या शरीरावर आहेत. पुढील तपास शनिशिंगणापूर पोलिस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.