लाहोर : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याचे दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर खिल्ली उडवली जात असल्याचे दिसत आहे.
पाक सरकारने पंतप्रधान इम्रान खान यांचे इस्लामाबादच्या रेड झोनमध्ये असणारं अधिकृत निवासस्थान भाड्याने देण्याचा निर्णय़ घेतला आहे. पाकिस्तानच्या फेडरल कॅबिनेटकडून यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात आला. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावरुन खिल्ली उडवली जात असून आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान कॅबिनेटने पंतप्रधानांचे हे अधिकृत निवासस्थान सांस्कृतिक, शैक्षणिक, फॅशन तसेच इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शिस्त पाळली जावी तसेच नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी दोन समिती स्थापन करण्यात आल्याचे तिथल्या स्थानिक वृत्तवाहिनीने दिले आहे.
याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान-तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) सरकारने पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान शैक्षणिक संस्थेत रुपांतरित करण्याचे जाहीर केले होते. तसेच सरकारने वसाहत परंपरा मोडण्यासाठी राज्यपाल आपल्या सरकारी निवासस्थानांमध्ये राहणार नाहीत असे जाहीर केले होते. याशिवाय मोठ्या प्रमाणात खर्च कमी करण्यासंबंधीही घोषणा केली होती. हा पैसा लोककल्याण योजनांसाठी वापरला जाऊ शकतो असं पाकिस्तान सरकारने म्हटले होते.