नवी दिल्ली – चीनकडून विकत घेतल्यानंतर निकामी झाल्यामुळे नुसत्या पडून राहिलेल्या ५ विमानांचा लिलाव करण्याचा निर्णय नेपाळने घेतला आहे. ही विमाने गेल्या ३ वर्षांपासून नुसती पडून राहिली आहेत आणि त्यांच्या देखभालीवर नेपाळला मोठा खर्च करावा लागतो आहे. त्यामुळे या विमानांचा लिलाव करून ती विकून टाकण्याचे नेपाळ एअरलाईन्स कॉर्पोरेशनने ठरवले आहे.
या ५ विमानांमध्ये एमए-६० बनावटीची २ आणि वाय-१२ ई बनावटीच्या ३ विमानांचा समावेश आहे. या विमानांच्या खरेदीसाठी उत्सुक असलेल्या व्यक्ती आणि संस्थांनी आपली बोली ४ फेब्रुवारीपर्यंत नोंदवावी, असे कॉर्पोरेशनने म्हटले आहे.
नेपाळच्या डोंगराळ आणि अतिदुर्गम भागामध्ये संपर्क साधण्यासाठी नेपाळने चीनकडून ही विमाने खरेदी केली होती. या सहा विमानंच्या खरेदीसाठी २०१२ मध्ये चीनबरोबर करार झाला होता. चीननेच यासाठी नेपाळला ४०८ दशक्ष युआन (६.६७ अब्ज नेपाळी रुपये)चे कर्ज दिले होते.
मात्र निकामी झाल्यामुळे ही विमाने त्रिभुवन विमानतळावर ३० जुलै २०२० पासून धूळ खात पडून राहिली आहेत. एक आणखीन विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे बाद झाले आहे.