नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. नीरजने आता दोहा डायमंड लीगचं विजेतेपद मिळवले आहे. मागील वर्षीप्रमाणे या वर्षी देखील त्याने उत्तम कामगिरीला सुरुवात केली आहे. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटरवर भाला फेकला.
या स्पर्धेत जेकोब वडलेज्च दोहा डायमंड लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. तर ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावले. गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अँडरसन पीटर्सनं नीरज चोप्राचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं होतं. मात्र उत्तम कामगिरी करत नीरज चोप्राने या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले.
पहिल्या प्रयत्नात दमदार कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला 86.06 मीटर लांब गेल्याने तो अव्वल स्थानीच होता. तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला 85.47 मीटर असा आणखी कमी दूर गेला. दुसऱ्या प्रयत्नात याकुब 88.63 मीटर भालाफेक करून नीरजच्या जवळ पोहोचला होता.
नीरजचा चौथा प्रयत्न फाऊल ठरला आणि पाचव्या प्रयत्नात 84.37 मीटर भालाफेक झाली. तर सहाव्या प्रयत्नात नीरजला 86.52 मीटर लांब भाला फेकता आला. त्याला टक्कर देणाऱ्या जाकुबला 84.76 मीटर भाला फेकता आल्याने नीरजचे विजेतेपद निश्चित झाले.
Neeraj Chopra wins 🥇 at the Wanda Diamond League in Doha on Friday with a throw of 88.67m 🇮🇳
#IndianAthletics pic.twitter.com/6PP5thpcNR— Athletics Federation of India (@afiindia) May 5, 2023
दोहा येथे झालेली ही स्पर्धा डायमंड लीग 2023 चा पहिला टप्पा असून याची अंतिम फेरी 16 आणि 17 सप्टेंबर रोजी युजीन येथे होणार आहे. प्रत्येक भालाफेकपटूला पहिल्या स्थानासाठी1 गुण, दुसऱ्या स्थानासाठी 7 , तिसऱ्या स्थानासाठी 6 आणि चौथ्या स्थानासाठी 5 गुण मिळतात.
दरम्यान, नीरजने 2021 साली पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. त्याआधी 2018 मधील आशिया स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2022 जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवले होते.