पंढरपूरहून निघालेल्या पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यात प्रवेश
नीरा : पंढरपूरहून आळंदीला कार्तिक सोहळ्यासाठी निघालेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याने रविवारी (दि. 13) पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. त्यापूर्वी या सोहळ्यातील संत नामदेव महाराजांच्या चल पादुकांना नीरा नदीतील दत्त घाटावर शाही स्नान घालण्यात आले. न्यानाबा तुकारामाचा गजर करीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने हा स्नानाचा कार्यक्रम पार पडला.
संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी सकाळी साडेआकरा वाजता नीरा नगरीत आगमन झाले. ग्रामस्थांनी या सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.यानंतर हा सोहळा विठ्ठल मंदिरात विसावला. यावेळी भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. तीन तासांच्या विश्रांती नंतर हा सोहळा वाल्हे येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. त्यापूर्वी सकाळी साडेनऊ वाजता हा सोहळा नीरा येथील दत्त घाटावर आला. यानंतर या सोहळ्यातील पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात शाही स्नान घालण्यात आले.
नीरा आणि भिवरा या दोन नद्या वारीच्या वाटेवरील अत्यंत महत्त्वाच्या नद्या आहेत. प्रत्यक्ष नामदेव महाराजांनीच एका अभंगात याबाबत लिहून ठेवले आहे.ते म्हणतात की, नीरा भीवरा दृष्टीस पडल्यावर समाधान प्राप्त होते अस त्यांनी म्हटलंय. त्यामुळे संतांच्या नीरा स्नानाला मोठे महत्त्व आहे.
– केशव महाराज नामदास, संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज