परवडणारी बरीच तयार घरे विक्रीविना पडून
एका संस्थेकडून पुण्यातील 6 ठिकाणी सर्वेक्षण
पुणे – परवडणाऱ्या घरांची गरज आणि पुरवठा यात समन्वय नसल्यामुळे पुण्यासारख्या शहरात बऱ्याच गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना घरे पाहिजे असूनही ती उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बरीच तयार घरे विक्री न होता पडून आहेत, असा दावा एका संस्थेने सर्वेक्षणाच्या आधारावर केला आहे.
हे सर्वेक्षण केलेल्या खोपा टेक्नॉलॉजी या संस्थेचे सहसंस्थापक मेघ घोलप यांनी सांगितले की, पुण्यातील 6 ठिकाणी 12 हजार कुटुंबांना भेट देऊन आम्ही घरासंबंधातील अपेक्षा, घरांचे स्थळ, आकार, किमान सुविधा, किंमत, कर्ज आणि पुरवठा याचा मेळ घालणारे समीकरण तयार केले आहे. आम्ही यासंदर्भात पुण्यातील विकासकांना मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. या प्रारुपाद्वारे जागा मालक, विकसक, वित्तसंस्था, सरकारी योजना आणि ग्राहकांचा एकात्मिक विचार केला गेला आहे.
सर्वेक्षणानुसार पुणे मनपाच्या हद्दीत साधारणपणे 8 ते 10 लाखांत 1 वनरूम किचन, 15 ते 20 लाखांत 1 बीएचके आणि 25 ते 30 लाखांत 2 बीएचके सदनिका ग्राहकांना हव्या आहेत. त्याचबरोबर ही घरे शहराच्या कोणत्या भागात असावीत हे महत्त्वाचे आहे. पुण्यात साधारणपणे संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 41 टक्के तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या 59 टक्के व्यक्ती आहेत. सध्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीच्या तुलनेत पुणे मनपाच्या हद्दीत घर घेण्यास पसंती असणाऱ्यांची संख्या चार पटीने अधिक आहे. ही संस्था सर्वेक्षणाच्या मदतीने जागामालक व विकासकांना योग्य प्रकारची घरे विकसित करण्यासाठी मदत करणार आहे.