पुणे – दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच लागणार आहे. या दोन्ही इयत्तांच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी विविध दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी सेतू केंद्रात होते. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उत्पन्नाचा दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर, जातीचा दाखला आदी दाखले ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. सेतू केंद्रात न जाता विद्यार्थ्यांना घराजवळील महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्ज करता येणार आहे.
सीबीएसई आणि सीआयएससीई या दहावी व बारावी परिक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. आता महाराष्ट्र बोर्डाचे दहावी व बारावी परीक्षेचे निकाल लवकरच लागणार आहे. निकालानंतर शाळा, कॉलेजच्या प्रवेश प्रकियेदरम्यान विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी नागरिकांची गर्दी होते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असल्याने प्रशासनाला दाखले देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यातून नागरिक आणि शासकीय कर्मचारी यांच्यात वादावादी होते.
दाखल्यांसाठी अर्ज करताना नागरिकांना बराच वेळ रांगेत उभे रहावे लागते. तसेच अर्जामध्ये त्रुटी असल्यास पुन्हा हेलपाटे मारावे लागतात. प्रवेश प्रक्रियेच्या कालावधीत दाखला मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका असतो. विद्यार्थ्यांना दाखल्यांसाठी नागरी सुविधा केद्रांत हेलपाटे मारावे लागू नये. यासाठी ऑनलाइन पद्धतीने दाखले देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी निकालाची वाट न पाहता आत्ताच दाखल्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध दाखले आणि आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा दाखला – अर्ज, स्वघोषणापत्र, फोटो, विजेचे बिल, करपावती, रेशनकार्ड यापैकी एक, फॉर्म-16 किंवा तलाठ्याकडील उत्पन्नाचा दाखला यापैकी एक.
वय-राष्ट्रीयत्व, अधिवास दाखला – स्वघोषणापत्र, फोटो, विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला किवा जन्म दाखला, दहा वर्षांचे रहिवास पुराव्यासाठी विजेचे बिल अथवा महापालिकेची करपावती, आधारकार्ड यापैकी एक.
नॉन क्रीमिलेअर प्रमाणपत्र – स्वघोषणापत्र, फोटो, लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, तीन वर्षाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र, विजेचे बिल, आधारकार्ड आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासांठी प्रमाणपत्र – स्वघोषणापत्र, फोटो, उत्पन्नाचे स्वघोषणापत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 1967 पासून महाराष्ट्रातील वास्तव्याचे पुरावे, लाभार्थी आणि वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, विजेचे बिल, करपावती, आधारकार्ड यापैकी एक.
“डिजिटल’चाही पर्याय
“आपले सरकार’ या संकेतस्थळावरूनही डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले ऑनलाइन मिळणार आहे. यासाठी अर्जदाराने आपले सरकार या संकेतस्थळावर जाऊन लॉग-इन करणे आवश्यक आहे. ऑनलाइन आवश्यक ती माहिती भरल्यानंतर तसेच कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज ऑनलाइन स्वीकारला जाणार आहे.
त्यानंतर अर्जदाराला ई-मेलद्वारे तसेच या संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरी असलेले दाखले मिळणार आहे.
माझ्या घराजवळ केंद्र कोठे आहे?
महा ई सेवा केंद्रांची यादी aapalesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर गेल्यावर संपर्क या वर क्लिक केल्यावर आपला जिल्हा आणि तालुका निवडा यामध्ये सर्व महा-ई-सेवा केंद्राची यादी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये केंद्राचा पत्ता, ईमेलआयडी आणि फोन नंबर असणार आहे. यावरून जवळचे महा ई सेवा केंद्र शोधता येणार आहे.