पुणे – पुणे रेल्वे स्टेशनमधून अन्य शहरात पार्सल पाठविण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वेकडून पाठविले जाणारे सर्व पार्सल आता स्कॅन करूनच पाठविले जाणार आहेत. त्यासाठी दोन स्कॅनिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणे रेल्वे विभागाच्या व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी दिली.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात 83 स्टेशन आहेत. येथून दिवसाला साधारण 155 ट्रेन धावतात. त्यापैकी 65 ट्रेन या पुणे विभागातून सुटतात. दिवसाला साधारण सव्वा लाख प्रवासी विभागातून प्रवास करतात. पुणे रेल्वे विभागाला प्रवासी व मालवाहतूक नंतर पार्सलमधून सर्वाधिक उत्पन्न मिळले. गेल्या वर्षी पुणे रेल्वेला पार्सलच्या माध्यमातून 27 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे.
पुणे विभागात रेल्वेतून छोट्या वस्तूपासून ते दुचाकी वाहनांपर्यंत पार्सल सेवा दिली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने फळे, भाज्या, औद्योगिक कंपन्याची उत्पादने, लगेज, कपडे, कॉस्मेटिक वस्तू, इलक्ट्रिक वस्तू पाठविल्या जातात. या वस्तू पॅकिंग असतात. आतामध्ये पॅकिंग पार्सलमधून काय पाठविले जातेय, हे रेल्वेला समजत नव्हते. त्यामुळे धोकायदायक वस्तू देखील पार्सल होण्याची भीती आहे. त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासनाने स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला.
पोस्ट सेवेलाही होणार फायदा
नागरिकांना घरपोच वस्तू मिळावी, या दृष्टीकोनातून टपाल विभागासोबत रेल्वेने पार्सल सेवा सुरू केली आहे. टपाल विभाग घरातून वस्तू गोळा करून रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन येईल. रेल्वेने पार्सल इच्छित स्थळी असलेल्या रेल्वे स्टेशनवर घेऊन जाईल. तेथून टपाल विभाग संबंधित पत्यावर पार्सल पोहचवेल. तसेच औद्योगिक कंपन्यांकडून जास्तीत जास्त पार्सल कसे मिळेल, याचाही प्रयत्न सुरू आहे.