पुणे :- डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी (एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या २२ व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ ५०,००० डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉ मध्ये पहिल्या फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती, झील देसाई यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती हिने जपानच्या एरी शिमिझूचा ६-३,६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा सामना १ तास ७ मिनिटे चालला. अव्वल मानांकित लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तजाला भारताच्या सहजा यमलापल्ली हिने विजयासाठी चांगलेच झुंजवले. सेमेनिस्तजाने सहजावर ५-७,६-३,६-३ असा तीन सेटमध्ये विजय मिळवला. ग्रीसच्या सॅपफो साकेल्लारिडी हिने भारताच्या सातव्या मानांकित अंकिता रैनाचा ३-६, ६-३, ६-२ असा पराभव करून पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले. लकी लुझर ठरलेल्या भारताच्या झील देसाई हिने भारताच्या ऋतुजा भोसलेचा टायब्रेकमध्ये ७-६, ६-२ असा पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
फिनलंडच्या एनास्तेसिया कुलिकोवा हिने लकी लुझर ठरलेल्या जपानच्या युकीना सायगोला ६-०,६-३ असे नमविले. जपानच्या चौथ्या मानांकित हिमेनो साकात्सुमेने सर्बियाच्या डेजाना राडानोविकचे आव्हान ६-३, ३-६, ६-१ असे संपुष्टात आणले. क्वालिफायर स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्वायोवाने जपानच्या साकी इमामुराचा ७-५, ४-६,६-१ असा तीन सेटमध्ये पराभव केला. पाचव्या मानांकित फिलिपिन्सच्या अलेक्झांड्रा एलाने हंगेरीच्या फॅनी स्टोलरचा ६-२, ६-२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
Australian Open 2024 : मेलबर्नमध्ये मेदवेदेवचा विजयी धडाका कायम! उपांत्य फेरीत मारली धडक…
दुहेरीत पहिल्या फेरीत ग्रीसच्या सॅपफो साकेल्लारिडी व भारताच्या प्रार्थना ठोंबरे या दुसऱ्या मानांकित जोडीने भारताच्या ईश्वरी मातेरे व मधुरिमा सावंत यांचा ६-१, ६-४ असा तर, भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती व वैदेही चौधरी यांनी स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्वायोवा व ऑस्ट्रियाच्या टीना नादिन स्मिथ यांचा ६-३, ५-७, १०-८ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत धडक मारली.