पिंपरी – गली गली मे शोर है, भाजपवाले चोर है, भगाओ भगाओ चोर भगाओ, भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो, चोरांचा पक्ष भाजप पक्ष, धरा दाम, करा काम अशी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेवर मोर्चाही काढला होता. आज करण्यात आलेले आंदोलन हे गेल्या साडेचार वर्षांतील सर्वांत मोठे आणि अनोखे ठरले.
आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक अजित गव्हाणे, प्रवीण भालेकर, मयूर कलाटे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडली होती. त्यामध्ये स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे भाजपाच्या महापालिकेतील भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तबच झाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना अटक केली. सध्या हे पाचहीजण जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणानंतर महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्थायी समिती बरखास्त करण्याची मागणी करत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महापालिका भवनवर आज मोर्चा काढण्यात आला.
आंदोलनावेळी हातगाडीवर टोपली ठेवून त्यामध्ये नकली नोटा ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर खाऊ गल्ली असा उल्लेख केला होता. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नकली नोटांची उधळण करत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली.
आमदारांची नार्को टेस्ट करा
सत्तारुढ पक्षेनेते नामदेव ढाके यांनी स्थायी समितीच्या सर्वच अध्यक्षांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना माजी नगरसेवक प्रशांत शितोळे म्हणाले, नार्को टेस्ट झालीच पाहिजे, मी स्वतः अध्यक्ष होतो. माझीही टेस्ट करा. मात्र त्यापूर्वी भाजपचे आता जे कारभारी आहेत ते पहिले राष्ट्रवादी पक्षामध्ये होते. पक्षाने त्या दोघांनाही स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले होते. त्यांची पहिल्यांदा नार्को टेस्ट करा. त्यातूनच कोणाच्या काळात खरा भ्रष्टाचार झाला हे उघड होईल. दोन्ही आमदारांची नार्को टेस्ट केली, तर भाजपचे पितळ उघडे पडेल.
यापुढे राष्ट्रवादीच्या सदस्यांची
स्थायीच्या बैठकीला गैरहजेरी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे म्हणाले, नागरी समस्या सोडविण्याऐवजी भ्रष्टाचार करून स्वतःची तिजोरी भरण्यात भाजपाचे पदाधिकारी व्यस्त आहेत. स्थायी समितीवर झालेल्या कारवाईत रंगेहाथ पकडल्याने भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला आहे. त्यामुळे स्थायी समिती बरखास्त करण्यात यावी. स्थायी समितीमध्ये आमचेही चार सदस्य आहेत. त्यांचीही चौकशी झाली तरी आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्यच करू. तसेच यापुढे स्थायी समितीच्या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य हजर असणार नाही. भाजपने त्यांच्या सदस्यांचे राजीनामे घ्यावेत. आम्हीही आमच्या सदस्यांचे राजीनामे घेण्यास तयार आहोत.
अजितदादांचा हस्तक्षेप नाही
माजी महापौर योगेश बहल म्हणाले, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये तसेच त्यानंतरच्या तपासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हात असल्याचा बिनबुडाचा आरोप भाजप करत आहे. अजितदादांनी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा, असेच यापुर्वीही सांगितले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य जरी दोषी आढळले तरी कोणाचीही गय करू नका. भ्रष्टाचार उघडकीस आला पाहिजे. त्यामुळे त्यांचा यामध्ये काहीच हस्तक्षेप नाही. मात्र आपले पाप लपविण्यासाठी भाजपाकडून अजितदादांवर आरोप होत आहेत.