नगर (प्रतिनिधी) – महापालिका स्थायी समितीच्या आठ नवीन सदस्यांची निवड आज घोषित करण्यात आली. त्यात शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी दोन व बसपाच्या एका नगरसेवकाला संधी मिळाली आहे. आज दुपारी एक वाजता महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत नव्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
नव्याने निवड झालेेल्या सदस्यांत शिवसेनेचे प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश घुले, समद खान, भाजपचे रवींद्र बारस्कर, वंदना ताठे व बसपाच्या मुदस्सर शेख यांचा समावेश आहे. महानगरपालिका स्थायी समितीच्या सभागृहात शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी पाच सदस्य, भाजपचे चार, काँग्रेस व बसपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. स्थायी समितीत महाविकास आघाडीचे स्पष्ट बहुमत आहे. तथापि, येथे शिवसेनेला बाजूला ठेवून सत्ताकारण असल्याने राष्ट्रवादीने सभापतिपदासाठी फिल्डिंग लावली आहे.
सध्याचे सभापती मनोज कोतकर भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. त्यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन स्थायीचे सभापतिपद पदरात पाडून घेतले. महाविकास आघाडीचा धर्म दाखवून राष्ट्रवादीला सभापतिपद मिळत असल्याने जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या मध्यस्तीने मागील निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतली. तथापि, अखेरपर्यंत कोतकर कुणाचे? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.
नव्या आठ सदस्यांच्या निवड घोषित
शिवसेना: प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, रिता भाकरे
राष्ट्रवादी: अविनाश घुले, समद खान
भाजप: रवींद्र बारस्कर, वंदना ताठे
बसपा: मुदस्सर शेख
आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य अविनाश घुले सभापतिपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सभापतिपदाची फिल्डिंग लावली आहे. त्यात महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेला कितपत संधी मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.