आंबिल ओढ्यावरील कल्व्हर्टसाठी 20 कोटी

कामाला स्थायीत मंजुरी : गेल्या दीड वर्षांपासून रखडले होते काम

 

पुणे – गेल्या दीड वर्षांपासून भीजत घोंगडे असलेला आंबिल ओढ्यावरील कल्व्हर्ट बांधण्याचा विषय मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याविषयी माहिती दिली.

25 सप्टेंबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्यावरील कल्व्हर्टचे नुकसान झाले होते. त्यातील काही कल्व्हर्ट नव्याने बांधण्याचे आणि त्यांची उंची वाढवण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने हा विषय पुढे सरकलाच नाही. परंतु, मंगळवारी अखेर या कामाला मुहूर्त लागला असून, या कामाच्या 20 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली.

अतिवृष्टीच्या घटनेनंतर महापालिकेने एका संस्थेमार्फत आंबिल ओढ्याच्या उगमापासून नदीपर्यंत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महापूरामध्ये 280 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने बांधला. त्यानंतर झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद केली. परंतु, दीड वर्षांपासून कोणतीच कामे झाली नाहीत. या कामाच्या निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. अखेर त्याला मुहूर्त मिळाला आणि स्थायीमध्ये त्याला मंजुरी मिळाली.

कामासाठी तीन निविदा

प्रशासनाने गुजरवाडी ते मित्रमंडळ चौक यादरम्यान आंबिल ओढ्यावर असलेल्या कल्व्हर्ट बांधण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. या कामासाठी तीन निविदा आल्या होत्या. यापैकी सर्वात कमी दराने “मे. पाटील कन्स्ट्रक्‍शन ऍण्ड इन्फास्ट्रक्‍चर’ या ठेकेदाराची निविदा आली आहे. त्यानुसार या ठेकेदाराकडून कल्व्हर्टचे काम 20 कोटी 2 लाख 57 हजार 930 रुपयामध्ये करून घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला स्थायीने मंगळवारी मंजुरी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.